ST Strike News Today Big Shock To Employees 6 Private Drivers Appointment By Administration | ST संपावर प्रशासनाने शोधला पर्याय, कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; ६ खासगी चालकांची नियुक्ती | Maharashtra Times
नागपूर : वारंवार आवाहन करूनही संपावरील कर्मचारी कामावर परत येत नसल्याने आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून रविवारी नागपूर विभागात ६ चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे संप सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूर, अमरावती येथे फेऱ्या पाठविता आल्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दोन महिने उलटूनही अजून तोडगा निघाला नाही. संपकरी कर्मचारी वारंवार विनंती करूनही कामावर हजर होत नाही. दरम्यान आता सरकारने सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांना हाक दिली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवेत येण्याची तयारी दाखविली आहे. अर्थात या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना रुजू करून घेण्यात येणार आहे. सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती पत्करलेल्या चालकांना करार पद्धतीने नेमणूक करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्याने संपकeऱ्यांत खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्करला आजपासून बूस्टर डोस, रात्रीचंही लसीकरण… एसटीच्या नागपूर विभागात एसएसके सर्व्हिसेस या कंपनीमार्फत रविवारी ६ चालकांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान आतापर्यंत संपावर असलेल्यांपैकी ७० कर्मचारी रुजू झाले आहेत.
नागपूर विभागातून ८० फेऱ्या
९ जानेवारी रोजी नागपूर विभागातून ३१ बसेसनी ८० फेऱ्या केल्या. यात गणेशपेठ आगार ११, इमामवाडा ५, घाटरोड ४, उमरेड ३, सावनेर ४, वर्धमानगर २, काटोल १, रामटेक १ अशा गाड्यांचा समावेश होता. या वाहतुकीद्वारे प्रशासनाला २ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. आज पहिल्यांदाच चंद्रपूर, अमरावती येथेही फेऱ्या सोडण्यात आल्या.