हायलाइट्स:
- आमदार शहाजी पाटील यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा
- वादानंतर पाटील यांनी केलं घुमजाव
- पक्षनेतृत्वाचं कौतुक करत भाजपला लगावला टोला
‘मी शिवसेना अथवा आघाडी सरकारवर नाराज नसून सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नसल्याबाबत तसं बोललो. मात्र माझ्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे आता मी अडचणीत आल्याने यापुढे बोलताना सावधगिरी बाळगणार आहे,’ अशा शब्दात आज शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी आपली बाजू मांडली.
भाजपला लगावला टोला
पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना शहाजी पाटील यांनी शिवसेना पक्षावर आणि आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचे हे भाषण सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारमध्ये शिवसेना आमदारही समाधानी नाहीत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. राज्यातील कोणताही शिवसेनेचा आमदार पक्षावर अथवा सरकारवर नाराज नसून ही भाजपने उठवलेली आवई असल्याचा टोलाही शहाजी पाटील यांनी लगावला आहे.
माझ्या मतदारसंघासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्तापर्यंत २६० कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून अजून ११०० कोटी रुपयांची कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं. आम्हाला गरज असते तेव्हा मुख्यमंत्री आम्हाला सह्याद्री अतिथीगृह, मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर भेटतात, आमची चौकशी करतात, अडलेली सर्व कामे मार्गी लावत असताना आम्ही पक्षावर आणि सरकारवर का नाराज होऊ? असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे.