हायलाइट्स:
- इस्लामपूर नगरपालिकेत आढावा बैठक
- तब्बल पाच वर्षांनी मंत्री जयंत पाटलांची हजेरी
- विरोधकांच्या सत्तेमुळे फिरवली होती पाठ
इस्लामपूर नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३१ वर्षांच्या सत्तेला २०१६ च्या निवडणुकीत सुरुंग लागला होता. नगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यामुळे मंत्री जयंत पाटील (राष्ट्रवादीचे जयंत पाटील) यांनी गेली पाच वर्ष नगरपालिकेकडे दुर्लक्ष केलं होतं. भाजप आणि शिवसेनेचा कार्यकाल संपताच पाच वर्षांच्या कालखंडानंतर अखेर मंत्री जयंत पाटील यांनी आज इस्लामपूर नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी, गेल्या पाच वर्षात शहरात नावीन्यपूर्ण विकासकामे काय झाली? असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांच्या कामांवर बोट ठेवले.
मंत्री जयंत पाटील यांची इस्लामपूर नगरपालिकेवर अनेक वर्ष एकहाती सत्ता होती. २०१६ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आघाडीने राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावली. तो पराभव पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. राज्यात सत्तेत आल्यानंतरही मंत्री पाटील यांनी नगरपालिकेत जाणे टाळले होते.
गेल्याच आठवड्यात भाजप आणि शिवसेनेचा नगरपालिकेतील कार्यकाळ संपला. त्यामुळे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी प्रशासक म्हणून नगरपालिकेचे सूत्रे हाती घेतली आहेत. विरोधक सत्तेतून पायउतार होताच मंत्री जयंत पाटील यांनी आज नगरपालिकेत आढावा बैठक घेतली.
इस्लामपूर शहरात गेल्या पाच वर्षात नावीन्यपूर्ण विकासकामे झाली का? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी विरोधकांच्या कामांवर बोट ठेवले. शहराच्या विकासासाठी राज्य सरकार लागेल तेवढा निधी देईल. शहरातील भुयारी गटर्स, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, गॅस पाईपलाईन, पार्किंग असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी देऊ, अशी ग्वाही मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
दरम्यान, तब्बल पाच वर्षांनी इस्लामपूर नगरपालिकेत पोहचलेल्या जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचं स्पष्ट झालं आहे.