पाकिस्तानसारख्या एखाद्या मुस्लीम देशात एखाद्या महिलेनं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत झेप घ्यावी, ही अतिशय महत्त्वाची घटना म्हणून ओळखली जातेय. होय, आयशा मलिक या पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या न्यायाधीश ठरणार आहेत. (आयशा मलिक, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश, पाकिस्तान)
अभ्यास, जिज्ञासा, कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आयशा मलिक यांनी गाठलेला हा पल्ला उल्लेखनीय ठरतोय.
पाकिस्तानच्या न्यायिक आयोगानं आयशा मलिक यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. संसदीय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर मलिक या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतील. या पदापर्यंत पोहचणं हे पाकिस्तानसारख्या देशातील महिला नागरिकांसाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही.
असा होता आयशा मलिक यांचा प्रवास
३ जून १९६६ रोजी जन्मलेल्या आयशा मलिक यांनी कराचीच्या ‘ग्रामर स्कूल’मधून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी ‘गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स’ कराची इथून पदवी प्राप्त केली. याच दरम्यान कायदेशीर शिक्षणाकडे त्यांचा कल वाढला आणि लाहोरच्या ‘कॉलेज ऑफ लॉ’मधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या ‘हार्वर्ड स्कूल ऑफ लॉ’मधून एलएलएम (मास्टर्स ऑफ लॉ) चं शिक्षण पूर्ण केलं.
१९९८-१९९९ मध्ये आयशा मलिक यांची योग्यता ओळखून ‘लंडन एच गॅमन फेलो’ म्हणून निवड करण्यात आली. आयशा मलिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात कराचीतील ‘फखरुद्दीन जी इब्राहिम अँड कंपनी’सोबत केली. १९९७ ते २००१ अशी चार वर्षे त्यांनी इथे प्रॅक्टीस केली. पुढच्या १० वर्षांत त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली तसंच अनेक प्रसिद्ध लॉ फर्म्सशी त्या जोडली गेली. २०१२ मध्ये आयशा मलिक यांची लाहोर उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि त्या कायद्याच्या क्षेत्रातील एक मोठं नाव बनल्या.
आयशा यांच्या नियुक्तीला आक्षेप
आपल्या न्याय्य आणि निर्दोष निर्णयांमुळे चर्चेत राहणाऱ्या आयेशा यांच्या अलीकडील नियुक्तीला काही न्यायाधीश आणि वकिलांनी विरोध केला आहे. आयेशा यांची सेवाज्येष्ठता तसंच पदासाठीच्या पात्रतेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. दुसरीकडे, या विरोधाला प्रत्यूत्तर म्हणून ‘वुमन इन लॉ इनिशिएटिव्ह-पाकिस्तान’ या संघटनेकडून यापूर्वीच्या तब्बल ४१ प्रसंगांचा उल्लेख करण्यात आलाय, जेव्हा सेवाज्येष्ठता नाकारून नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी न्यायिक आयोगानं आयेशा यांची या पदावर नियुक्ती करण्यास नकार दिला होता.
आयशा मलिक या देशात महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या मानल्या जातात. देशातील अनेक दिग्गजांनी आयशा मलिक यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला आहे. ‘आयशा मलिक यांनी एक नवा इतिहास कायम केल्याची’ प्रतिक्रिया पाकिस्तानी लेखिका बीना शाह यांनी व्यक्त केलीय.