हायलाइट्स:
- डोंबिवलीमधील कोपर परिसरातील धक्कादायक प्रकार
- ताडीचे अतिसेवन केल्याने दोन तरूणांचा मृत्यू
- ताडी विक्रेत्याविरोधात दाखल केला गुन्हा
डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख व स्वप्नील चोळके घरी परतत असताना, रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला. त्याच्या मित्रांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वी या दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी ताडीविक्रेता रवी भटनेविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या दोघांचा मृत्यू ताडीचे अतिसेवन केल्याने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले. मृत सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत मृतांच्या नातेवाइकांनी प्रतिक्रिया दिली आहे. मृत तरूणांच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. तर तरुणांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.