हायलाइट्स:

  • राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढली
  • पुणे जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी कडक निर्बंध
  • जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

लोणावळा : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे असलेल्या मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले व स्मारके, विविध पर्यटनस्थळे, धरणे व परिसर इत्यादी ठिकाणी मंगळवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी कायदा (कलम १४४) लागू करण्यात आला असून यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. (पुणे आज निर्बंध)

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी नागरीक व पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. सदर ठिकाणी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व पर्यटकांची गर्दी होत असते. या पर्यटनाच्या ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉलही लावण्यात आलेले असतात. सदर खाद्य पदार्थ विक्री स्टॉलवर पर्यटक विना मास्क, सामाजिक अंतराचे पालन न करता गर्दी करतात. त्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतराचे पालन इत्यादी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना विषाणूचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. तसंच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्या प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून मंगळवारी ११ जानेवारी मध्यरात्री पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

Sharad Pawar : उत्तर प्रदेश निवडणुकीत नेमकं काय होईल?; शरद पवार यांनी केलं मोठं भाकित

जिल्ह्यातील प्रतिबंधित केलेली क्षेत्र कोणती?

– मावळ : भुशी, लोणावळा,तुंगार्ली, पवना, वलवण ही धरणे, घुबड तलाव, राजमाची, टायगर, लायन्स, व शिवलिंग व मंकी पॉईंट, अमृतांजन पूल, वेहेरगाव-कार्ला, भाजे व बेडसे लेणी, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा हे गडकिल्ले व परिसर इत्यादी.

– मुळशी : लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉईंट, सहारा सिटी, कोळवण परिसर इत्यादी.

– हवेली : घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर इत्यादी.

– आंबेगाव : डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ इत्यादी.

– जुन्नर : शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र इत्यादी.

– भोर : रोहडेश्वर/विचित्र गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड इत्यादी.

– वेल्हा : तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर इत्यादी.

भाजपचे १३ आमदार राजीनामा देणार, शरद पवारांचा खळबळजनक दावा

कोणते निर्बंध लागू असणार?

– ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रतिबंधित ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.
– प्रतिबंधित केलेल्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करण्यास मनाई.
– वाहतुकीचे रस्ते तसंच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.
– वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे.
– सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिक साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
– सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
– सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा सुरू ठेवणे, डीजे. सिस्टम वाजवणे, गाडीमधील स्पिकर उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे.
– ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे.

दरम्यान, प्रशासनाने जारी केलेले प्रतिबंधात्मक आदेश पोलीस, शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी, डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाहीत. सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनीय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here