हायलाइट्स:
- मुंबईत तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच आली गुड न्यूज
- दैनंदिन करोना रुग्णसंख्येत मोठी घट
- गेल्या २४ तासांत ११, ६४७ नवीन रुग्णांची नोंद
- सक्रिय रुग्णांची संख्या १ लाखांहून अधिक
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत करोनाचा (coronavirus) प्रादूर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईत तिसरी लाट आली की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. मुंबईत करोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता, सरकारने मुंबईसह संपूर्ण राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून नवीन करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
काय आहे सध्याची स्थिती?
मुंबईत आज, मंगळवारी करोनाच्या ११,६४७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ५२३ वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आला आहे. तर दैनंदिन रुग्णसंख्याही घटली आहे. गेल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या २०,७०० वरून ११,६४७ वर आली आहे. तर रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा उपलब्ध आहेत. गेल्या २२ दिवसांत ४६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसाला सरासरी दोन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे करोनाची संभाव्य तिसरी लाट आल्याचे चित्र दिसत असले तरी, घाबरण्याचे कारण नाही. मात्र, खबरदारी घेण्याची अधिक गरज आहे. तोंडावर मास्क लावावे आणि कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.