हायलाइट्स:
- महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झाली वाढ
- ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्येही किंचित वाढ
- मुंबईत मात्र, दिलासा, दैनंदिन रुग्णसंख्या घटली
- मास्क वापरा, कोविड नियमांचे पालन करा
राज्य आरोग्य विभागाने आज, मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज, मंगळवारी ३४,४२४ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर २२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १८, ९६७ रूग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६६, २१, ०७० करोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके झाले आहे.
राज्यात २२ मृत्यू
राज्यात आज, मंगळवारी (गेल्या २४ तासांत) २२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २. ०२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०९,२८,९५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,८७,९३८ (९.८५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,६४,९८७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३०३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात आज ३४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण
आज राज्यात ३४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात २५, पुणे ग्रामीणमध्ये ६, सोलापूर २, पनवेलमध्ये एकाला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १२८१ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या घटली
मुंबईत आज, मंगळवारी करोनाच्या ११,६४७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ५२३ वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आला आहे. तर दैनंदिन रुग्णसंख्याही घटली आहे. गेल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या २०,७०० वरून ११,६४७ वर आली आहे. तर रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा उपलब्ध आहेत. गेल्या २२ दिवसांत ४६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसाला सरासरी दोन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे करोनाची संभाव्य तिसरी लाट आल्याचे चित्र दिसत असले तरी, घाबरण्याचे कारण नाही. मात्र, खबरदारी घेण्याची अधिक गरज आहे. तोंडावर मास्क लावावे आणि कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.