एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावं, म्हणून गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत. मात्र शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. संपातील कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी शासन स्तरावर विविध मार्ग अवलंबले जात आहेत. यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. अशातच आज नाधवडे येथील कर्मचारी धनाजी मल्हारी वायदंडे यांनी आत्महत्या केली.
या आत्महत्येमुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. रात्री उशिरापर्यंत एसटी कर्मचारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल इचलकरंजी येथे एका कर्मचार्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने आंदोलन सुरू असतानाच मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी आत्महत्येचा हा प्रकार घडला यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.