औरंगाबाद : कोव्हॅक्सिन लशीनंतर पॅरासिटामोल घ्यावी का घेऊ नये, यावर बरीच चर्चा सुरू असून, अनेक पालक मंडळी चिंतातूर झाल्याचेही समोर येत आहे. मात्र कोणतीही लस घेतल्यानंतर ताप व इतर काही लक्षणे दिसू शकतात; परंतु ही लक्षणे एक ते दोन दिवसांत नाहिशीही होतात. त्यामुळे कुठलीच लक्षणे नसताना किंवा सौम्य लक्षणे असताना औषधी टाळावी, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

लस दिल्यानंतर अनेक केंद्रांवर पॅरासिटामोलच्या गोळ्या प्रत्येकाला आवर्जून दिल्या जातात, यावर आक्षेप घेत कोव्हॅक्सिन लशीचे निर्माते असलेल्या भारत बायोटेक कंपनीने, ‘लस घेणाऱ्या प्रत्येकाला पॅरासिटामोल देऊ नये’, अशीही सूचना केली आहे. त्यातच १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याने चर्चेला उधाण आले आहे. अर्थातच, या संदर्भात गोंधळाचे वातावरण असून, तीव्र ताप, अंगदुखी किंवा लस टोचलेल्या जागी लाली किंवा वेदना असतील, तर मग काय घ्यायचे, अशा वेळी पॅरासिटामोल घेतली तर काही दुष्परिणाम होतील का, असेही अनुषंगिक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात आपत्कालिन व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. पद्मनाभ केसकर म्हणाले, कोणतीही लस घेतल्यानंतर ज्या आजाराविरुद्ध ती दिली गेली आहे, त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी संबंधिताच्या शरीरामध्ये प्रतिपिंडे (अँटिबॉडीज्) तयार होत असतात आणि त्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणून ताप येणे, अंगदुखी व इतर लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या शरीरामध्ये चांगल्या प्रतीची प्रतिपिंडे तयार होत आहेत, हेच दर्शवत असतात. मात्र, यापैकी बहुतांश लक्षणे २४ किंवा ४८ तासांत नैसर्गिकरित्या कमी होत असतात. ही लक्षणे तीव्र स्वरुपाची असतील, तरच औषधोपचारांची गरज असते. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन नक्कीच औषधे घेता येतात, असेही डॉ. केसकर म्हणाले.

बापरे, करोनाच्या लसीमध्ये गाई, डुक्कर आणि इतर प्रांण्याचे रक्त? चिकित्सकांच्या दाव्यामुळे खळबळ
केंद्रांवर गोळ्या देणे बंद व्हावे

लस दिल्यानंतर ताप येणे किंवा काहीशी अंगदुखी असणे किंवा कणकण जाणवणे अशी लक्षणे पूर्णत: नैसर्गिक असते. खरे तर अशी लक्षणे म्हणजे नैसर्गिक बचावात्मक यंत्रणा (प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम) कार्यरत होत असते आणि संबंधित लस ही प्रभावी आहे, असाही त्याचा अर्थ आहे. त्यामुळे लस घेतलेल्या प्रत्येकाला सरसकट पॅरासिटामोल किंवा इतर गोळ‌्या देणे योग्य म्हणता येणार नाही. मात्र अनेक लसीकरण केंद्रांवर अशा गोळ्या दिल्या जातात, ज्याची खरोखर गरज नाही, असेही फिजिशियन डॉ. अजय दंडे म्हणाले.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! फ्लॉवर, मिरचीसह गवारही महाग, पाहा काय आहेत नवे दर?

पॅरासिटामोल किंवा पेनकेलर औषधांमध्ये ‘अँटि-इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी’ असते व गरज नसताना ती दिल्यास चांगल्या प्रतिपिंडांच्या निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. मात्र पॅरासिटामोल दिल्यास रिअॅक्शन येते किंवा दुसरा कुठला त्रास होऊ शकतो, यामध्ये काहीही तथ्य नाही, अशी माहिती आपत्कालिन व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. पद्मनाभ केसकर यांनी दिली आहे.

तर लस दिल्यास सौम्य ताप किंवा इतर सौम्य लक्षणे असल्यास संबंधित व्यक्तीने भरपूर पाणी पिणे, आराम करणे अपेक्षित आहे. कोणतीही सौम्य लक्षणे एखाद-दुसरा दिवस सहन करणे सहज शक्य आहे. मात्र, पॅरासिटामोल घेतल्यामुळे लशीची परिणामकारक कमी होते, असे नाही, असं फिजिशियन डॉ. अजय दंडे यांनी म्हटलं आहे.

नागिरकांनो गर्दी करू नका! तुमच्या नजर ठेवण्यासाठी पालिकेने नियुक्त केली ३५ पथकं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here