औरंगाबाद : करोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अचानक हाताबाहेर जाताना पाहायला मिळाली. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना, ऑक्सिजनची गरज भासू लागली. आशा परिस्थितीत रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं होतं. काही रुग्णालयांनी संधी साधत रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवाढव्य प्रमाणात बिल वसूल केले होते. आता अशाच अवाढव्य प्रमाणात बिल वसूल करणाऱ्या रुग्णालयांना प्रशासनाने नोटीस पाठवल्या आहेत.
करोनाच्या काळात उपचार करताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून किती बिल घ्यावे याबाबत प्रशासनाने निकष ठरवून दिले होते. मात्र, असे असतानाही शहरातील काही रुग्णालयाने रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसूल केल्याची तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने त्या सर्व बिलाची चौकशी करण्याचे आदेश काढले होते. नुकताच या चौकशीचा अहवाल आला असून, त्यानुसार अधिकच बिल वसूल करणाऱ्या १२ रुग्णालयांना प्रशासनाने नोटीस पाठवली आहे.
विशेष म्हणजे तिसऱ्या लाटेत जर रुग्णांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली तर, प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच बिल घेण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्वच रुग्णालयांना आधीच देण्यात आल्या आहेत. यानंतरही खासगी रुग्णालयांनी निकषांपेक्षा अधिक बिलांची वसुली केली तर लेखापरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.