दोडक्याचे भाव स्थिर असून ६० रुपये प्रती किलो असा सध्याचा दर आहे. तर ६० रुपये प्रती किलो दराने विक्री होणाऱ्या गवारचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी वधारले असून पत्ताकोबीही १० रुपयांनी महाग झाले आहे. ५० ते ६० रुपये प्रती किलो या दराने त्याची विक्री होत असल्याचे विक्रेते येवलेकर यांनी सांगितले. हिरवी मिरची कडाडली असून ५० ते ६० रुपये प्रती किलो असा सध्याचा दर आहे. १५ दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये दर होता. यासह वांगे ८० रुपये किलो फ्लॉवर ६० रुपये, काकडी २० रुपये, लिंबू १५ रुपये, भोपळा २० रुपये, गाजर ३० रुपये, चवळी ५० ते ६० रुपये, कारले ६० रुपये, वाटणा ३० ते ४० रुपये प्रती किलो असे दर आहेत.
तर टोमॅटोच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. १२ दिवसांपूर्वी ४० रुपयांना मिळणारे टोमॅटोचा दर सध्या १० ते १५ रुपये प्रती किलो झाला आहे. अद्रकचे भावही किलोमागे १० ते १५ रुपयांच्या घरात आहे. तर दुसरीकडे शिमला मिरची २० रुपयांनी महागली असून ५० ते ६० रुपये किलो असा सध्याचा दर आहे.
पालेभाज्या महागल्या
आवक मंदावल्याने पालेभाज्याच्या दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी १० रुपयांत मेथीच्या दोन जुड्या येत होत्या. पण सध्या १० रुपयात एक जुडी मिळत आहे. पालक, शेपूच्या दरातही दोन ते चार रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबिरीची एक जुडी १० रुपयांना, पालक ६ ते ८ रुपयांना असे सध्याचे दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.