हायलाइट्स:
- राज्यात ९८ लाख नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही
- करोना लस घेतलेल्या नागरिकांना सध्या करोनाची लागण होत असली तरी त्यांच्यामधील लक्षणे सौम्य आहेत
- लस न घेतलेल्या नागरिकांच्या आजाराची तीव्रता जास्त आहे
करोना लस घेतलेल्या नागरिकांना सध्या करोनाची लागण होत असली तरी त्यांच्यामधील लक्षणे सौम्य आहेत. परंतु, लस न घेतलेल्या नागरिकांच्या आजाराची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे करोना लस ही उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी करोना लस घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.
महाराष्ट्रात करोना आणि ओमिक्रॉनबाधित रुग्ण पुन्हा वाढले
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, मागील दोन दिवसांपासून काहीसा रुग्णसंख्यावाढीला ‘ब्रेक’ लागला होता. मात्र, मंगळवारी (मागील २४ तासांत) करोना आणि नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. काल राज्यात ३४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मंगळवारी ३४,४२४ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर २२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १८, ९६७ रूग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६६, २१, ०७० करोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके झाले आहे. राज्यात मंगळवारी (गेल्या २४ तासांत) २२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २. ०२ टक्के आहे.
पंतप्रधानांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद
देशातील करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ३० राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.