संतोष परब हल्ला प्रकरणात स्थानिक कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टात मागील मंगळवारी सकाळी राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. राज्य सरकारने ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही कोर्टात दिली होती. त्यामुळे राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले होते.
यानंतर, आज पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. राणे यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून मिळालेला दिलासा कायम आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना अटक केली जाणार नाही, अशी ग्वाही कणकवली पोलिसांनी मुंबई हायकोर्टात दिली आहे. आजची सुनावणी अपूर्ण राहिल्याने उद्या, गुरुवारी दुपारी एक वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
१८ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास सिंधुदुर्गमधील केनेडी रोडवर संतोष परब हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली होती. त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर त्या कारमधील एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूहल्ला केला आणि तो पसार झाला. या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच दिवशी रात्री चेतन पवार, करण बाळासाहेब कांबळे, अनिल नक्का व करण दत्तू कांबळे यांना अटक केली. त्यानंतर २० डिसेंबरला दीपक वाघोडेला व २६ डिसेंबरला सचिन सातपुतेला अटक केली. ‘संतोष परब हा जिल्हा बँक निवडणुकीत राणे कुटुंबाविषयी अपप्रचार करत असल्याने त्याला धडा शिकवायला हवा, असे म्हणत नितेश राणे यांनी सचिन सातपुतेला संतोषचा फोटो देऊन आवश्यक ते करण्यास सांगितले’, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.