हायलाइट्स:
- ‘अधिक प्रभावी करोना लशीची गर्जना’
- ‘विषाणूचा प्रसार रोखता येईल अशा लशीची गरज’
- जागतिक आरोग्य संघटनेचं मत
ओमिक्रॉन संरक्षण देण्यासाठी जगातील करोना लस अधिक प्रभावी करणं आवश्यक असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलंय. ‘डब्ल्यूएचओ’चा तांत्रिक सल्लागार गट आणि १८ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका गटानं करोना लशीच्या निर्मितीवर भाष्य केलंय.
सध्या उपलब्ध असलेल्या लस गंभीर आजार आणि ‘व्हॅरियंट ऑफ कन्सर्न‘ (VOCs) मुळे होणाऱ्या मृत्यूंपासून उच्च पातळीचं संरक्षण प्रदान करत आहेत. परंतु, भविष्यात आपल्याला अशा लशी निर्माण करण्याची गरज आहे ज्या संक्रमणाला रोखू शकतील, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.
दरम्यान, करोना विषाणूवर प्रतिबंधक लस अधिक प्रभावी बनवण्याची गरज आहे, जेणेकरून विषाणूचा प्रसार रोखता येईल, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. बुस्टर डोसची आवश्यकता कमी करणाऱ्या आणि व्यापक, मजबूत तसंच दीर्घकाळ चालू शकेल अशा लशींच्या निर्मितीची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलीय.
‘ओमिक्रॉन’नं डेल्टालाही टाकलं मागे
तज्ज्ञांकडून करोना लस उत्पादकांना ओमिक्रॉनसहीत वेगवेगळ्या व्हेरियंट विरुद्ध विशिष्ट लशींच्या कार्यप्रदर्शनावर डेटा प्रदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. यामुळे, लशीच्या रचनेत कधी बदल करणे आवश्यक आहे हे ठरविण्यात मदत होईल, असा विश्वास तज्ज्ञांना आहे.
करोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट वेगानं ‘डेल्टा’ व्हेरियंटलाही संसर्गाच्या बाबतीत मागे टाकत आहे. संपूर्ण जगभरात या स्वरुपातील संक्रमणाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.