या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी आणि त्यानंतर मंगळवारी मुंबईत एकही ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे करोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र मुंबईत तरी दिसत होते. मात्र, आज बुधवारी ओमिक्रॉनबाधितांची आकडा वाढण्याची शक्यता आहे. टीपीआर अंदाजे २५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरी राहा आणि सुरक्षित राहा. आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. लस जरूर घ्या, असे आवाहनही डॉ. शशांक जोशी यांनी ट्विटद्वारे केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी ३४, ४२४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली होती. त्याच्या आदल्या दिवशीच्या म्हणजेच सोमवारच्या तुलनेत ९५४ रुग्ण वाढले होते. तर करोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात मंगळवारी ओमिक्रॉनबाधितांची संख्या ३४ होती. याचबरोबर एकूण करोनाबाधितांची संख्या १२८१ वर पोहोचली आहे. त्यापैकी पुणे शहर परिसरातील २५, पुणे ग्रामीणमधील सहा, सोलापूरमधील दोन आणि पनवेलमधील एक रुग्ण आहे.
करोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांच्या तुलनेत मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाण अधिक आहे. नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. केवळ ४८ तासांत मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ५ टक्क्यांनी घटली आहे. ८ जानेवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १,०६,०३७ इतकी होती. ती ११ जानेवारी रोजी घटून १,००,५२३ इतकी आहे.