हायलाइट्स:
- मुंबईतून चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण
- बाळाच्या विक्रीचा डाव उधळला, पोलिसांनी केली सुटका
- मुंबई पोलिसांनी तामिळनाडूतून केली बाळाची सुटका
- अपहरण प्रकरणात ११ आरोपींना आतापर्यंत अटक
तपासादरम्यान आढळून आले की, तामिळनाडूतील एका जोडप्याला मूल हवे होते. त्याचवेळी एका डॉक्टरने सांगितलं की, काही रकमेच्या बदल्यात बाळ देण्यास मी तुमची मदत करेन. त्यानंतर डॉक्टरांनी रॅकेटमध्ये असलेल्या महिलांशी संपर्क साधला आणि इब्राहिम शेख यांच्यापर्यंत पोहचले. त्याने चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण केलं. त्यानंतर हा व्यवहार ४ लाख ८० हजार रुपयांना ठरवला. त्यानंतर त्याने हे बाळ या रॅकेटमधील महिलांच्या ताब्यात दिले. इब्राहिम शेखने बाळाचा पिता असल्याचा दावा केला, अशी माहिती झोन २ चे पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली.
गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, व्ही.पी. मार्ग पोलिसांनी पाच पथके तयार केली. अपहृत बाळाचा शोध सुरू केला. पथकांनी आपल्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी इब्राहिम याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्यानेच हा सर्व कट रचला असल्याचे तपासात समोर आले. चौकशीत त्याने मित्र मोहम्मद शेरखान उर्फ शेरू पिर मोहम्मद खान याचे नाव घेतले. पोलिसांनी शेरूला ताब्यात घेतले आणि शेरुच्या चौकशीला सुरुवात केली. शेरूच्या चौकशीत त्याने सद्दाम अब्दुला शाह याचे नाव घेतले. सद्दामची पत्नी लक्ष्मी मुरगेश ही तामिळनाडूच्या मूर्ती पलानि सामी (वय ३९) हिच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. बाळाला त्यांनी आधी कर्नाटकला नेले होते. त्यानंतर तामिळनाडू येथील सेलम जिल्ह्यात असलेल्या एका गावात नेले. त्यानंतर मुंबईच्या व्ही. पी. मार्ग पोलिसांची एक टीम त्या गावात गेली. तामिळनाडूमधली आणखी दोन ठिकाणीही शोध घेतला. अखेर कोइम्बतूरजवळच्या सेलवानपट्टी गावात हे बाळ असल्याची माहिती मिळाली. या बाळाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी तामिळनाडूतून पाच जणांना अटक केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला डॉक्टर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.