कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपला सोबत घेत दोन्ही काँग्रेसनी आमची फसवणूक केली, फसवण्याची त्यांची परंपरा जुनीच आहे, पण हे पाप याच जन्मात फेडावं लागेल,’ असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. (चंद्रकांत पाटील कोल्हापूर)
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील तसंच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. ‘सहकारात भाजपची ताकद मर्यादित आहे. यामुळे त्यातल्या त्यात चांगला पर्याय म्हणून आम्ही दोन्ही काँग्रेससोबत गेलो. त्यामुळे अमल महाडिक बिनविरोध संचालक झाले. सहयोगी सदस्य असलेल्या जनसुराज्यला दोन जागा मिळाल्या. पण, आमदार प्रकाश आवाडे आणि अशोक चराटी यांना दोन्ही काँग्रेसने फसवले. या फसवणुकीमुळे भाजपचा दोन जागांवर पराभव झाला. पण दोन्ही काँग्रेसचे हे पाप आता उघडकीस आले आहे. हे पाप याच जन्मात फेडावं लागेल,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे. Corona Update in Maharashtra : करोनानं धास्ती वाढवली; राज्यभरात रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, ‘ही’ आहे ताजी स्थिती
‘मुश्रीफ हे कागलचे नेते’
मंत्री हसन मुश्रीफ यांना कागलबाहेर काही ज्ञान नाही. त्यामुळे करोनाबाबत केंद्राने घातलेले निर्बंध, राज्य सरकारने केलेले नियम याची त्यांना माहिती नाही, असा टोला मारत चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुळात राज्य सरकारच्या मंत्र्यामध्येच एकवाक्यता नाही. रोज एक मंत्री नवा नियम लावतो, त्यांच्यातच अंडरस्टँडिंग नाही. त्यामुळे रात्री संचारबंदी असली तरी सारे काही व्यवस्थित सुरू आहे. त्यासाठी काहींची सेटलमेंट झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून जयश्री चंद्रकांत जाधव यांनी भाजपच्या तिकिटावर लढावं यासाठी दोन दिवसात त्यांना भेटणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहेत. तसंच जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. चंद्रकांत जाधव हे भाजपचे होते. संधी नसल्याने ऐनवेळी त्यांनी काँग्रेसचे चिन्ह घेतलं. पण हे घराणे भाजपचंच असल्याने जाधव यांनी आमच्यावतीने लढावे असा आग्रह आम्ही धरणार आहे. त्यांनी नकार दिला तर काय करायचे हे पक्षाच्या बैठकीत ठरवण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.