औरंगाबाद न्यूज लाइव्ह: ‘साहेब, त्याला कायमचा खल्लास केला’, खून करून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर – aurangabad crime after murder the accused himself appeared at the police station
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बालानगरातील सत्तावीस वर्षीय युवकावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपण खून केल्याची कबुली दिली. संतोष भानुदास गल्हाटे (वय २७, रा. बालानगर, ता. पैठण) असे मृताचे नाव असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालानगर येथील दारूच्या दुकानाच्या समोरील मैदानावर बुधवारी रात्री गावातील संतोष गल्हाटे (२७) व भावकीतील दिनेश भाऊसाहेब गल्हाटे (२७) यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणातून वाद सुरू झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दिनेश गल्हाटेने संतोषच्या डोक्यात, हातावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला ठार मारले. संतोषचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर दिनेश याने थेट एमआयडीसी पैठण पोलीस ठाणे गाठले. मी संतोषला कायमचा खल्लास केला आहे, असे त्याने सांगितल्यावर पोलिसांना धक्काच बसला. Coronavirus Update : राज्याची चिंता वाढली, २ करोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क हरवले यानंतर पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेत विचारपूस करून सर्व घटना त्यांच्याकडून समजून घेतली. जुन्या वादाच्या रागातून दिनेशने खुनाची कबुली दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांना घटनेची माहिती दिली.
यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास एमआयडीसी पैठण पोलीस करीत आहेत.