हायलाइट्स:
- बुल्लीबाई लिलाव अॅप प्रकरणाचा जागतिक निषेध
- सोशल मीडियावर मुस्लीम महिला टार्गेटवर
- कारवाई करण्याची गरज व्यक्त
सुली डील्स, बुल्ली बाई यांसारख्या सोशल मीडिया अॅपद्वारे झालेल्या मुस्लिम महिलांच्या छळाची संयुक्त राष्ट्रांनी विशेष दखल घेतली आहे. या प्रकाराचा निषेध करून त्या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधीने म्हटले आहे.
अल्पसंख्याकांच्या प्रश्नांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी डॉ. फर्नांड दी व्हॅरेनेस यांनी मंगळवारी ट्विटरवर भारतातील अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली असून, भारतातील मुस्लिम महिलांचा सोशल मीडिया अॅप्सवर छळ केला जातो, तसेच त्यांचा लिलावही मांडला जात असल्याचे म्हटले आहे.
इंदूरमध्ये एकाला अटक
दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात ओंकारेश्वर ठाकूर (२६) याला अटक केली. तो मध्य प्रदेशातील इंदूर येथील असून गेल्या वर्षी जुलैमध्ये गिटहबवर आलेल्या वादग्रस्त अॅपचा निर्माता असल्याचे मानले जाते. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. या अॅपद्वारे शेकडो मुस्लिम महिलांची माहिती छायाचित्रांसह ऑनलाइन लिलावात मांडण्यात आली होती.
आरोपी बीसीए पदवीधारक असून, मुस्लिम महिलांची बदनामी करून त्यांना ट्रोल करण्याचे ठरवण्यात आले, त्या ट्विटरवरील गटाचा सदस्य असल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याने गिटहबवर हे अॅप विकसित केल्याचेही मान्य केले आहे. अॅपच्या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर त्याने यासंदर्भातील सर्व सोशल मीडियावरील पुरावे हटवले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहे बुल्ली बाई अॅप प्रकरण?
बुल्लीबाई अॅप उघडल्यानंतर रँडमली मुस्लिम महिलांचे फोटो दिसतात. युजर त्यातील एखादा फोटो ‘बुली बाय ऑफ द डे‘ म्हणून सीलेक्ट करतो. त्यानंतर त्यावर अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केल्या जातात आणि त्या फोटोवर बोली लावली जाते. मग हा फोटो बुल्लीबाई या हॅशटॅगने दिवसभर ट्रेंड केला जातो. सध्या ट्वीटर आणि फेसबुकवर अधिक सक्रिय असलेल्या किमान १०० महिलांना या अॅपवरून लक्ष्य करण्यात येतं. मीडियासह इतर क्षेत्रातील महिलांचाही त्यात समावेश आहे. ही धक्कादायक माहिती एका महिला पत्रकारानं उजेडात आणल्यानंतर त्यावर समाजातील सर्व स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणात अॅप हँडलर, २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी विशाल झा आणि १८ वर्षीय श्वेता सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे.