हायलाइट्स:
- महाराष्ट्रातील रुग्णालयांत करोना रुग्ण वाढू शकतात
- जानेवारी अखेरीपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला वाढू शकते संख्या
- महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली चिंता
- ऑक्सिजनच्या मागणीत वाढ
‘ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रिक टनापर्यंत वाढली तर, कठोर निर्बंधांची आवश्यकता भासेल,’ असे राज्य सरकारनेही स्पष्ट केलेले आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहीम अधिक तीव्र केली पाहिजे आणि आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असेही राज्य सरकारने म्हटले आहे. शहरी भागांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातही करोनाचा प्रादूर्भाव वाढलेला दिसून येत आहे, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.
‘त्यांना’ ऑक्सिजनची गरज नाही
संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला तरी, त्यांना ऑक्सिजनची गरज भासत नाही. मात्र, लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कारण ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही आरोग्य सेवेवर ताण वाढत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. २ लाख २५ हजार उपचाराधीन रुग्णांमधील केवळ १४ टक्के रुग्ण हे रुग्णालयांत दाखल आहेत, ही एक दिलासा देणारी बाब आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सद्यस्थिती
या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे दिसत होते. मात्र, बुधवारी करोनानं पुन्हा डोके वर काढले. बुधवारी राज्यात ४६, ७२३ नवीन रुग्ण आढळले. तर ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. याच कालावधीत २८,०४१ करोना रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकट्या मुंबईत १६ हजार ४२०, तर पुणे मनपा हद्दीत ४ हजार ९०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.