हायलाइट्स:
- काँग्रेसचे पदाधिकारी अॅड. उमेश ठाकूर यांच्यासह तिघांना अटक
- तक्रारदाराला खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव
- अलिबाग पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने गुन्हा केला उघड
- महिलेसह तरूणाला हाताशी धरून रचला होता डाव
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलीस ठाण्यात अॅड. उमेश ठाकूर यांच्या अन्य दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसह आणखी एका साथीदाराला १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुख्य सूत्रधार असलेल्या ठाकूर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. ते सध्या मेडिकल कस्टडीमध्ये आहेत. अलिबाग पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास केला. अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे पुढील तपास करीत आहेत.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न
अलिबागमधील अॅड्. उमेश ठाकूर हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. ते वकिली व्यवसाय करतात. त्यांचा वाळूचा देखील व्यवसाय आहे. अॅड्. ठाकूर यांच्या वाळू व्यवसायाबाबत पेण येथील काशीनाथ ठाकूर यांनी विविध कार्यालयांत तक्रार अर्ज दाखल केले होते. त्यामुळे ठाकूर यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. याचा राग ठाकूर यांच्या मनात होता. काशिनाथ ठाकूर यांना अद्दल घडवण्यासाठी ठाकूर यांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट आखला. त्यासाठी त्यांनी अलिबागमधील एका महिलेसह शुभम गुंजाळ या १९ वर्षीय तरुणाला हाताशी धरले. ठाकूर यांनी काशीनाथ ठाकूर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्या खात्यावरून महिलेच्या फेसबुक खात्यावर १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अश्लील मेसेज आणि चित्रफित पाठवली. त्यानंतर वकिलांनी मनीषा यांना घेऊन अलिबाग पोलीस ठाण्यात काशीनाथ ठाकूर यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. महिलेची तक्रार असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास त्वरित करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांना दिल्या. त्यानुसार सणस यांनी सायबर सेलची मदतीने तपास केला. यात शुभम गुंजाळ हा आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. शुभमची सखोल चौकशी केल्यानंतर यामागे अॅड्. उमेश ठाकूर यांचा हात असल्याचे समोर आले. त्यानंतर अॅड्. ठाकूर, संबंधित महिला आणि शुभम गुंजाळ या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली.