हायलाइट्स:
- जिल्हा कारागृहातील १३ कैद्यांना करोनाची बाधा
- सर्व कैद्यांचे लसीकरण झाले होते पूर्ण
- कारागृहात क्षमता २०० कैद्यांची अन् दाखल होते ४५४ कैदी
कारागृहातील २० कैद्यांना करोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. यात १३ कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या १३ कैद्यांना कागदपत्रांची तपासणी करून पुढील उपचारासाठी तातडीने मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच जळगाव जिल्हा कारागृहात करोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्हा कारागृहात २०० कैद्यांची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत ४५४ कैदी दाखल आहेत. सर्व कैद्यांचे करोनाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. काही कैद्यांना करोनाचे लक्षणे जाणवत असल्याने त्यांची बुधवारी तपासणी करण्यात आली होती. सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारार्थ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथून कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात बाधित कैद्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, अशी माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी दिली आहे. कैद्यांसोबत नातेवाईकांच्या भेटी बंद करण्यात आल्या असून फोनवरूनच कैद्यांसोबत बोलण्याची नातेवाईकांना मुभा देण्यात आली आहे, असंही वांढेकर यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. कारागृहातून कैद्यांच्या पलायनामुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतानाच आता कारागृहात करोनाचा शिरकाव झाल्याने इतर कैद्यांच्या सोशल डिस्टन्सिंगसह करोनाबाबतच्या इतर नियमांचे पालन करण्याचा प्रश्न कारागृह प्रशासनासमोर उभा राहिला आहे.