हायलाइट्स:
- मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढताहेत
- पुढील दोन ते तीन आठवडे अत्यंत महत्वाचे
- ज्या वेगाने लाट आली, त्याच वेगाने ओसरेल, तज्ज्ञांचे भाकित
- जानेवारीच्या अखेरीपर्यंत तिसऱ्या लाटेचा जोर कमी होणार
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २१ हजारांच्या आसपास करोनाचे रुग्ण आढळले होते. दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या घटून ती ११ हजार ते १६ हजारांवर आली आहे. मुंबईत बुधवारी ६७,३३९ नागरिकांनी करोना चाचणी केली होती. त्यातील १६,४२० नागरिकांना करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील ९१६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. बुधवारीच १४,६४९ रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे नागरिक अधिक सतर्क झाले आहेत. घाबरून जाण्याऐवजी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विलगीकरण आणि घरातच औषधोपचार करून लोक बरे होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांतील ७० ते ८० टक्के खाटा रिकाम्या आहेत, असे मुंबई महापालिकेच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले.
करोनाची तिसरी लाट उच्चांकी पातळीवर
डॉ. हेमल शहा यांच्या माहितीनुसार, करोनाची तिसरी लाट उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. मात्र, दुसरीकडे करोना रुग्णसंख्या घटत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला ३० ते ४० रुग्ण कन्सल्टिंगसाठी येत होते. मात्र, आता हीच संख्या घटून ती १० ते १५ वर आली आहे. करोनाची लक्षणे आढळून येताच, नागरिक घरातच औषधोपचार करून बरे होत आहेत. संसर्ग रोग विशेषज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांच्या म्हणण्यानुसार, शहरात करोना प्रादूर्भाव नियंत्रणात आल्यानंतर सरकारने गावांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दुसऱ्या लाटेदरम्यान शहरी भागानंतर ग्रामीण भागात अधिक प्रभाव दिसून आला होता. मुंबईतून दररोज शेकडो नागरिक कोकणसह अन्य भागात जात आहेत. डॉ. सुनील कातकडे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कुठलीही आरोग्यविषयक तक्रार असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावेत.