हायलाइट्स:
- नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण
- मुंबई हायकोर्ट सुनावणार सोमवारी फैसला
- निकाल येईपर्यंत राणेंना दिलासा कायम
- नितेश राणेंना जामीन मिळणार की जेल?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि त्यांचे साथीदार संदेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोघांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, नितेश राणे यांच्यामार्फत ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी युक्तिवाद केला. या अर्जावर बुधवारी झालेल्या सुनावणीत नितेश राणे यांनी वकिलांमार्फत आपली बाजू मांडली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर मी म्याव म्याव असा आवाज काढल्याने सत्ताधाऱ्यांना त्यांचा अपमान झाला असे वाटले. त्याचा सूड घेण्याच्या उद्देशानेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या धामधुमीत मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आणि संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांच्या गुन्ह्यात मला गोवण्यात आले, असे नितेश राणे यांनी वकिलांमार्फत मुंबई हायकोर्टात युक्तिवाद केला होता. त्याचवेळी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत आणि निकाल येईपर्यंत त्यांच्यावर अटकेसारखी कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही कणकवली पोलिसांकडून मुंबई हायकोर्टात देण्यात आली होती. सुनावणी अपूर्ण राहिल्याने आज, गुरुवारीही मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. ही सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबत न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग हे सोमवारी निकाल देणार आहेत. दरम्यान, निकाल येईपर्यंत नितेश राणे आणि संदेश सावंत यांना अटकेपासून मिळालेला दिलासा कायम राहणार आहे.
काय आहे आरोप?
१८ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास सिंधुदुर्गमधील केनेडी रोडवर संतोष परब हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली होती. त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर त्या कारमधील एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूहल्ला केला आणि तो पसार झाला. या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच दिवशी रात्री चेतन पवार, करण बाळासाहेब कांबळे, अनिल नक्का व करण दत्तू कांबळे यांना अटक केली. त्यानंतर २० डिसेंबरला दीपक वाघोडेला व २६ डिसेंबरला सचिन सातपुतेला अटक केली. ‘संतोष परब हा जिल्हा बँक निवडणुकीत राणे कुटुंबाविषयी अपप्रचार करत असल्याने त्याला धडा शिकवायला हवा, असे म्हणत नितेश राणे यांनी सचिन सातपुतेला संतोषचा फोटो देऊन आवश्यक ते करण्यास सांगितले’, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.