हायलाइट्स:
- मराठी पाट्या लावण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
- काँग्रेसच्या युवा नेत्याने व्यक्त केलं वेगळं मत?
- सत्यजीत तांबे यांच्या ट्वीटची जोरदार चर्चा
राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेण्यात शिवसेनेचा पुढाकार आहे. यावर अन्य पक्षांकडून प्रतिक्रिया आलेल्या असल्या तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अर्थात महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून त्यांचा या निर्णयाला पाठिंबा असणार, हे गृहित धरलेलं जात आहे.
असं असले तरी काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी यासंबंधी केलेलं एक ट्वीट लक्षवेधी ठरत आहे. त्यातून त्यांनी या निर्णयाचे थेट समर्थन किंवा विरोधही केलेला नाही. मात्र, यासंबंधी काँग्रेसचे वेगळे मत असल्याचं मात्र ते सूचवू इच्छित असल्याचं दिसून येते.
ट्विटमध्ये सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे की, “पाटी” न लावताही व्यवसाय यशस्वी झाला पाहिजे. त्यासाठी हवे उत्तम, दर्जेदार उत्पादने, व्यवसायात कल्पकता व नाविन्य, मानवी संसाधनांचे योग्य नियोजन, उत्तम सेवा, योग्य, स्पर्धात्मक किंमत, व्यवहारिकता व आर्थिक नियोजन,’ग्राहक हाच परमेश्वर’ ही भावना, असं तांबे यांनी म्हटलं आहे. यावरून दुकानाची पाटी कोणत्या भाषेत हवी, याला फारशी किंमत नसल्याचंच ते सूचित तर करत नाहीत ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.