म. टा. वृत्तसेवा, ठाणे

आरोग्यमंत्र्यांचे आवाहन, स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेली शिष्टाई आणि कारवाईचा बडगा यामुळे हळूहळू का होईना आता खासगी दवाखाने उघडू लागले आहेत. काही दवाखाने सोमवारपासून नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. प्राप्त परिस्थितीत दररोज अत्यंत निकडीचे ठराविक रुग्ण तपासण्याचे धोरण वैद्याकीय व्यावसायिक अवलंबणार आहेत. मात्र दवाखान्याच्या ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी कशी रोखायची, ही चिंता त्यांना भेडसावत आहे.

‘करोना’संचारबंदी जाहीर झाल्यानंतर इतर आस्थापनांप्रमाणे खासगी दखाखानेही बंद झाले. या आणिबाणीच्या प्रसंगी खासगी डॉक्टरांनी आपली सेवा सुरू ठेवावी, असे आवाहन सरकारने केले. या काळात सेवा न देणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही विविध शहरांच्या वैद्यकीय व्यावसायिक संघटनांशी संवाद साधला. त्यानंतर या डॉक्टरांनी आता सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी ते स्वत:च्या तसेच संबंधित सेवकांच्या सुरक्षेविषयी साशंक आहेत.

‘करोना’ साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवा बजावताना डॉक्टर तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘पीपीई’ पोशाख (पर्सनल प्रोटेक्शन ईक्विपमेंट) आवश्यक आहे. सध्या कोणत्याही खासगी दवाखान्यात तो उपलब्ध नाही. जमावबंदी लागू असल्याने एकापेक्षा पाचजणांनी एकत्र येण्यास मनाई आहे. दवाखान्याबाहेर जर पाचपेक्षा अधिक रुग्ण गोळा झाले, तर काय करायचे, त्यांना कसे रोखायचे, प्राधान्यक्रमाने मर्यादित रुग्णांना तपासायचे म्हटले तरी प्राथमिकता कशी ठरवायची, असा पेच डॉक्टर व्यावसायिकांपुढे आहे. सेवा न देता दवाखाने बंद केले तर कारवाईची भीती आणि सुरू ठेवले तर ‘करोना’चा संसर्ग होण्याची शंका अशा दुहेरी कात्रीत डॉक्टर अडकले आहेत. ‘पीपीई’ पोशाख सरकारने उपलब्ध करून द्यावेत, त्यासाठी लागणारे पैसे आम्ही देऊ, अशी तयारीही काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दाखवली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here