हायलाइट्स:
- दुकानांवर मराठी नामफलक बंधनकारकचा निर्णय
- मनसेकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत
- अंमलबजावणी न झाल्यास खळखट्याकचा इशारा
- मनसेच्या ‘त्या’ आंदोलनाला १३ वर्षांनंतर आले यश
राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरांत असणे बंधनकारक आहे, असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर ठाण्यातील मनसेकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी आता उशिरा जाग आलेल्या ठाकरे सरकारला ‘मराठी’ भाषेची आठवण झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे आभार त्यांनी मानले. हा निर्णय फक्त कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणी करा नाही, तर पुन्हा मनसे स्टाइलने ‘खळखट्याक’ करण्याचा इशारा देखील यावेळी अविनाश जाधव यांनी दिला.
राज्य सरकारने दुकाने व आस्थापनांवरील फलक मराठी भाषेत लावण्यासह अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येतील, पण अक्षरांचा आकार हा मराठी अक्षरांपेक्षा मोठा असता कामा नये, असे स्पष्ट केले आहे. तसेच कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान १३ वर्षांपासून मराठी भाषेतील पाट्यांसाठी आग्रह धरत आंदोलने करणाऱ्या मनसेमुळेच महाराष्ट्र राज्यात सर्व दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीत होणार असल्यामुळे मनसेच्या १३ वर्षाच्या आंदोलनाला यश आले आहे. मराठी पाट्यांसाठी ठाण्यात प्रथम आंदोलनाला सुरुवात झाली होती, आता राज्य सरकारने घेतलेला निर्णय येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन घेतला आहे, असा आरोप जाधव यांनी केला. निर्णय जरी योग्य झाला असेल तरी त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.
दुकानावर मोठ्या अक्षरात मराठीत नाव लिहायचे की नाही हे आम्ही ठरवू – विरेन शाह