हायलाइट्स:
- मुंबईत करोना लाट असतानाच गेल्या २४ तासांत चित्र बदलले
- मुंबईत गेल्या २४ तासांत १३ हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद
- बुधवारच्या तुलनेत रुग्णसंख्या घटली
- ८४ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत
मुंबई महापालिकेने गेल्या २४ तासांतील करोना रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत १३, ७०२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर नवीन बाधितांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. याच कालावधीत २०,८४९ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ८५५८११ वर पोहोचली असून, रिकव्हरी रेट ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण ९५१२३ इतके आहेत. तर, दुपटीचा दर हा ३६ दिवसांवर आला आहे. कोविड वाढीचा दर हा ६ ते १२ जानेवारी या कालावधीत १.८५ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान, करोनाबाधित रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.
ओमायक्रॉन | ‘मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, पण केसेस वाढत गेल्या तर…’ – डॉ. राहुल पंडित
मुंबईत बुधवारी १६ हजारांहून अधिक रुग्ण
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी आकडेवारी जाहीर केली होती. सोमवारी आणि मंगळवारी रुग्णसंख्या घटली होती. मात्र, बुधवारी रुग्णसंख्येत वाढ नोंदवली. मंगळवारच्या तुलनेत जवळपास पाच हजार रुग्ण वाढले होते. बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत १६,४२० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले होते. दिलासादायक बाब म्हणजे ८४ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नव्हती.