पुणे : मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगोत्सव साजरा केला जातो. पतंग उडवण्यासाठी लागणारा मांजा वेगवेगळ्या प्रकारे बाजारपेठेत विकला जातो. त्यातीलच नायलॉन मांजावर सध्या बंदी आहे. परंतु याच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुण्यातून जुनेद अकबर कोल्हापुरवाला (२९, रा., गणेश पेठ, पुणे ) व अदनान असिफअली सय्यद (१९ .रा., गणेश पेठ, पुणे) यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिवांकडून मिळालेल्या आदेशानुसार, तसंच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिक मांजाने पक्षी व प्राणी यांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे सरंक्षणासाठी प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिकपासून बनवण्यात येणाऱ्या मांजाचा वापर करण्यास बंदी घातलेली आहे. संतापजनक! रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने महिलेने रस्त्याच्या कडेलाच दिला बाळाला जन्म
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी पुणे शहरात पाहणी करत असताना बोहरी आळी, रविवार पेठ भागात एक दुकानदार नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे समजले. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून दुकानात एका ग्राहकाला पाठवलं असता दुकानदार नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची खात्री पटली व पोलिसांनी तेथे छापा टाकला असता दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रीळ व काही रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ९६० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकारच्या मांजामुळे जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे याचा वापर आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.