औरंगाबाद : राज्यातही पावसासाठी पोषक हवामान असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादच्या काही भागात तरुळक पावसाचे थेंब पडल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती…
औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून सर्वदूर ढगाळ वातावरण असून, काही भागात सूर्यदर्शन सुद्धा झाले नाही. तर पैठण रोडवरील गेवराई परिसरात सकाळी दहा वाजेच्या दरम्यान तुरळक पावसाचे थेंब पडले आहेत. तर परभणी जिल्ह्यात काल रात्री अर्धा तास पाऊस झाला असून, सकाळपासून गारवा जाणवत आहे. हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधून मधून रिमझिम अगदी हलक्या स्वरूपाचा पाउस येतोय. तसेच उस्मानाबाद,जालना आणि लातूर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.