हायलाइट्स:

  • पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांतील वाद चव्हाट्यावर
  • ‘आमच्या मतांनी तुम्हाला पंतप्रधान बनवलं’
  • ‘…तर पुढच्या वेळी मतं देणार नाही’

इस्लामाबाद, पाकिस्तान:

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि संरक्षण मंत्री परवेझ खट्टक यांच्यात झालेली तिखट चर्चा चव्हाट्यावर आलीय. सत्ताधारी पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ (PTI) च्या संसदीय बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी, ‘आमच्या मतांनी तुम्हाला पंतप्रधान बनवलं’ अशा शब्दांत परवेझ खट्टक यांनी इम्रान खान यांना आरसा दाखवला. इतकंच नाही तर, तुमचं वर्तन भविष्यातही असंच सुरू राहिलं तर पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला मतं देणार नाही, अशी सूचना वजा धमकी खट्टक यांनी पंतप्रधानांना दिली.

पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांचा वाद

जिओ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, पुरवणी वित्त विधेयकाबाबत पक्ष नेतृत्वाला विश्वासात घेण्यासाठी पीटीआयच्या संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. हे विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मांडलं जाणार होतं. यादरम्यान संरक्षण मंत्री परवेझ खट्टक आणि इम्रान खान यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूर आलम यांनी विधेयकातील काही तरतुदींना विरोध केला.
Hareem Shah: सोशल मीडियावर पैशांचं प्रदर्शन, टिकटॉक स्टार अडचणीत
Imran Khan: ‘प्लेबॉय’ इम्रान खान सरकारकडून ‘कंडोम’वर टॅक्स, विरोधकांनी काढला चिमटा
काय होता आक्षेप?

या नेत्यांनी महागाई, मिनी बजेट आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) विधेयकावर गंभीर आक्षेप घेतला. खैबर पख्तूनख्वा प्रांत गॅस आणि वीज उत्पादक असूनही इथे गॅसवर बंदी आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुम्ही पंतप्रधान व्हावं यासाठी आम्ही मतदान केलं, पण तुमचं वर्तन असंच राहिलं तर पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, असा इशारा यावेळी खट्टक यांनी पंतप्रधानांना दिला.

इम्रान खान यांनी दिली बैठक सोडण्याची धमकी

खट्टक यांनी केलेल्या या टीकेमुळे इम्रान खान यांच्या रागाचाही पारा चढला. मग त्यांनीही सरळ बैठक मध्यावरच सोडून निघून जाण्याची धमकी दिली, असा दावा सूत्रांनी केलाय.

माझ्या कामावर तुम्ही समाधानी नसाल तर हे सरकार दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी मी तयार आहे, असंही यावेळी इम्रान खान यांनी म्हटलं. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान इम्रान यांना बैठकीतून निघून जाण्यापासून रोखलं.

या मुद्यावर बोलताना खट्टक यांनी पत्रकारांना आपला पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत कोणताही वाद झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं. आपण केवळ गॅसच्या मुद्यांशी संबंधित चर्चा केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

Watch Video: ३००० फूट उंचीवर २१७ किमी वेगानं उडणारी ‘फ्लाईंग कार’!
New Planet: अवकाशात आढळून आला ‘बटाट्या’सारखा ग्रह, शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here