राजकारण तसं ओढताणीचं. मात्र, केव्हा-केव्हा गमतीदार प्रकारही राजकारणाचा आखाड्यात घडतात आणि त्याची चर्चा पंचक्रोशीत होते. काहीसा असाच प्रकार गोंडपिपरी शहरात घडला. सध्या गोंडपिपरी शहरात नगर पंचायतीच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. अनेकांनी राजकीय आखाळ्यात उडी घेतली.
मतदारांना लुभावण्यासाठी नानाविध योजना प्रत्यक्षात उतरविण्याची उमेदवारात पैज लागली आहे. अशात काही कार्यकर्ते आणि मतदारांना उमेदवाराचा नवरोब्याने मटण पार्टीच आवतन दिलं. त्यासाठी सात किलो बिर्याणीचं मटण आणण्यात आलं. मटण घरी ठेऊन कार्यकर्त्यासह उमेदवाराचा पती पार्टी करण्यासाठी गेले. परत आल्यावर मात्र मटण गायब होतं. शोधाशोध करुनही मटण सापडलं नाही. शेवटी मटण चोरीला गेली असा अंदाज काढून वेळेवर साधी भाजी बनविण्यात आली. या प्रकाराची खमंग चर्चा शहरात आहे. इतकंच नाही तर या महापापाचे खापर उमेदवाराने विरोधकांवर फोडल्याची चर्चा आहे.