हायलाइट्स:
- ब्रिटनचे सद्य पंतप्रधान बोरिस जॉन्सन अडचणीत
- मूळ भारतीय नावाची चर्चा सुरू
- ऋषी सुनक भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई
करोना लॉकडाऊन काळात सामान्य जनता घरामध्ये कोंडून असताना जोरदार पार्टी झोडणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या अडचणीत आलेले दिसत आहेत. यामुळेच त्यांच्या खुर्चीलाही धोका निर्माण झालाय. वाढत्या दबावामुळे आपल्या बेजबाबदार वर्तनासाठी बोरिस जॉन्सन यांना आपल्या पदावर पाणी सोडावं लागू शकतं, असं म्हटलं जातंय. ब्रिटनचे अनेक खासदार आणि विरोधी नेते बोरिस जॉन्सन यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करत आहेत. याच दरम्यान, चर्चा सुरू झालीय ती एका एका मूळ भारतीय नावाची… ऋषी सुनक हे ते नावं!
ब्रिटिश मीडियाच्या म्हणण्यानुसार, बोरिस जॉन्सन यांना पद सोडावं लागलं तर त्यांच्याऐवजी ऋषी सुनक यांना पंतप्रधान पदाची संधी मिळू शकते. ऋषी सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
नेमकं काय घडलं?
देशात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २०२० मध्ये एक गार्डन पार्टी आयोजित केल्याचं नुकतंच समोर आलं. या पार्टीसाठी जॉन्सन यांचे मुख्य खाजगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांच्याकडून अनेकांना मेल धाडण्यात आल्याचंही समोर आलंय. आपल्या गार्डन पार्टीच्या बातम्यांना दुजोरा देतानाच या पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांनी माफीदेखील मागितली आहे. काही गोष्टी आपल्या सरकारनं ‘योग्य पद्धतीनं घेतल्या नाहीत’ असं स्पष्टीकरणही जॉन्सन यांनी दिलंय. ‘पार्टीगेट’ नावानं हे प्रकरण आता संपूर्ण जगभर ओळखलं जातंय.
मात्र, लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधानांच्या डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानाच्या बागेत पार्टी करून जॉन्सन आणि त्यांच्या कर्मचार्यांनी महामारीच्या आपल्याच नियमांचं उल्लंघन केल्यानं जॉन्सन यांना जनतेच्या आणि विरोधकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. यानंतर बोरिक जॉन्सन यांच्या गच्छंतीच्या चर्चेलाही उधाण आलं.
ऋषी सुनक यांच्या नावावर सट्टा
यातच ब्रिटनची एक प्रमुख सट्टा कंपनी ‘बेटफेयर’नं पुढचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक या नाववर सट्टा लावलाय. अडचणीत सापडलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असून भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक त्यांची जागा घेऊ शकतात, असा दावा ‘बेटफेअर’नं केलाय.
५७ वर्षीय जॉन्सन यांच्यावर केवळ विरोधी पक्षांकडूनच नव्हे तर आपल्याच पक्षातून राजीनाम्याचा दबाव आहे. जॉन्सन यांनी पदाचा राजीनामा दिल्यास ऋषी सुनक हे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, असा दावा ‘बेटफेअर’च्या सॅम रॉसबॉटम यांनी केलाय.
या शर्यतीत ऋषी सुनक यांच्यासोबतच लिझ ट्रस (परराष्ट्र मंत्री), मायकेल गोव्ह (कॅबिनेट मंत्री), माजी परराष्ट्र सचिव जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रिती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.
हे देखील शर्यतीत आहेत. जॉन्सनचे मुख्य खाजगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांनी अनेक लोकांना पार्टीला मेल केले होते. मात्र, त्यावेळी देशात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणाला ‘पार्टीगेट’ म्हटले जात आहे आणि जॉन्सनच्या सुमारे अडीच वर्षांच्या सत्तेतील हे सर्वात मोठे संकट म्हणून समोर आले आहे.
ऋषी सुनक यांच्याविषयी…
१९८० साली ऋषी सुनक यांनी विंचेस्टर कॉलेजमधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, राजकारणाचाही त्यांनी अभ्यास केलाय. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए पूर्ण केलं.
राजकारणात येण्यापूर्वी गुंतवणूक बँक ‘गोल्डमन सॅक्स’ आणि ‘हेज फंड’मध्येही त्यांनी काम केलंय. त्यांनी स्वत:ही एक गुंतवणूक कंपनीची स्थापना केली. त्यांनी १० कोटी पाऊंडच्या एका जागतिक गुंतवणूक कंपनीची आणि एका लहानशा ब्रिटिश व्यवसायाचीही स्थापना केली होती.
ऋषी सुनक यांचे वडील डॉक्टर होते आणि आई केमिस्ट दुकान चालवत होत्या. ते पंजाबहून लंडनला स्थायिक झाले होते. ऋषी सुनक सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत.