हायलाइट्स:
- ठाण्यातील शिळफाटा परिसरात प्लास्टिकच्या गोदामांना आग
- भीषण आगीत गोदामातील माल जळून खाक
- सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
- …तर मोठा अनर्थ घडला असता
ठाण्यातील मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात रोडलगत मोठ्या प्रमाणात भंगार, वाहने, पत्रे, बांबू, लाकूड अशी अनेक गोदामे आहेत. याच शिळफाटा परिसरात दोस्ती कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या खान कंपाउंड येथे प्लास्टिकच्या गोदामाला काल रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत आजूबाजूला लागून असलेली दोन दुकाने जाळून खाक झाली आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा भंगारातील माल जाळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे दोन अग्निबंब, दोन पाण्याचे टँकर, एक जम्बो पाण्याचा टँकर, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि मुंब्रा पोलीस घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले.
प्लास्टिकच्या गोदामांना ही आग कशामुळे लागली यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. मात्र वेळीच पोहचून अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गोदामाच्या आजूबाजूला अनेक भंगाराची, वाहनांची, पत्रे, बांबू, लाकडाची गोदामे आहेत. ही आग आटोक्यात आली नसती, तर आगीने रौद्ररूप धारण केले असते. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.