प्रसाद रानडे| रत्नागिरी: एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात एसटी संप (दुखवटा) सुरूच ठेवला आहे. दुसरीकडे, संपात सहभागी झालेल्या आणि वारंवार आवाहन करूनही मागे न हटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फी अथवा निलंबनाची कारवाई केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आता बडतर्फ केलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच अधिकारी घरी येऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झालेले आहे. मात्र, अद्याप संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा रूजू व्हावे असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. मात्र, काही कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना निलंबित आणि सेवेतून बडतर्फ केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आता या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली आहे. काही अधिकारी आमच्या घरी येऊन दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

ST Strike Update : आता महामंडळाचा संयम सुटला, संपावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई
‘शरद पवारांनी मुंबईतला गिरणी संप पाहिलाय; त्यांना एसटी कामगारांची काळजी वाटणे साहजिक’

दापोली एसटी आगारातील ६० कर्मचाऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या निवेदनाद्वारे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छामरणाची मागणी केली आहे. या ६० कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामुळे खळबळ उडाली आहे. ४१ टक्के पगारवाढ ही निव्वळ फसवी घोषणा असून, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग आणि एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असेही त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

गेल्या ६८ दिवसांपासून शांतपणे दुखवटा पाळत आहोत. प्रशासन मात्र कारवाई करत आहे. काही अधिकारी तर कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन दबाव टाकत आहेत. कामावर आले नाहीत तर, नोकरी जाऊ शकते, अशी भीती ते कुटुंबीयांना दाखवत आहेत. या प्रकाराकडे सरकारने लक्ष द्यावे. आम्ही आता स्वेच्छामरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागितली आहे. सध्या दिला जाणारा पगार पुरत नाही. जगण्यापेक्षा मेलेले बरे, अशी प्रतिक्रिया दापोली आगारातील बडतर्फ कर्मचारी मुनाफ राजापकर यांनी व्यक्त केली.

ST संपावर प्रशासनाने शोधला पर्याय, कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; ६ खासगी चालकांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here