हायलाइट्स:
- टेस्ट किटची नोंदणी बंधनकारक
- मुंबई महापालिकेने दिले नवीन दिशानिर्देश
- औषध विक्रेते, उत्पादकांसाठी नवे निर्देश
मुंबई महापालिकेने नव्याने जारी केलेल्या गाइडलाइन्सनुसार, होम अँटिजन टेस्ट किटची किती विक्री झाली, याबाबत उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांना दररोज संबंधित महापालिका अधिकारी किंवा अन्न व औषध प्रशासनाला माहिती देणारा इमेल करावा, असे निर्देश यात देण्यात आले आहेत.
प्रयोगशाळा किंवा व्यक्तींकडून व्यक्तीगतरित्या रॅपिड अँटिजन टेस्ट किट किंवा होम किटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्व कोविड १९ तपासणी अहवाल मोबाइल अॅपद्वारे आयसीएमआरला पाठवणे गरजेचे आहे, असेही निर्देश महापालिकेने जारी केलेल्या गाइडलाइन्समधून देण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, काही प्रमाणात होम टेस्ट किटचा अहवाल आयसीएमआरला पाठवण्यात आला नाही किंवा त्याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना रुग्णांची देखरेख करण्यात अडचणी येत आहेत आणि त्यामुळे संसर्ग अधिक फैलावला. त्यामुळे करोना संसर्ग रोखण्यासाठी अशा व्यक्तींवर नजर ठेवणे गरजेचे आहे.
नवीन गाइडलाइन्सनुसार, होम टेस्ट किटचे उत्पादक आणि वितरकांना मुंबईत केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांना विकल्या गेलेल्या किटच्या संख्येबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त किंवा मुंबई महापालिका प्रशासनाला कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी ग्राहकांना विकलेल्या टेस्ट किटची माहिती रोज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इमेलद्वारे द्यायची आहे.