हायलाइट्स:
- मुंबईत करोना लाट ओसरतेय
- करोना रुग्णांची संख्या सलग चौथ्या दिवशी घटली
- मुंबईत शुक्रवारी ११ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
- ८४ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत
मुंबई महापालिकेने गेल्या २४ तासांतील करोना रुग्णांची आकडेवारी आज, शुक्रवारी प्रसिद्ध केली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ११, ३१७ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ९, ८१, ३०६ झाली आहे. तथापि, ८४ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
मुंबईत काल, गुरुवारी १३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आज, शुक्रवारी जवळपास २ हजार रुग्ण कमी नोंदवले गेले आहेत. काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. गेल्या चार दिवसांत करोना रुग्णांची संख्या २०७०० वरून ११ हजारांवर आली आहे. त्यामुळे करोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र सध्या तरी दिसते.
करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे नवीन रुग्णांच्या दुप्पट
मुंबईत शुक्रवारी ११, ३१७ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर रुग्ण बरे झालेल्यांची संख्या २२०७३ इतकी आहे. त्यामुळे नवीन करोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. आतापर्यंत ८,७७, ८८४ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ९५,१२३ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी शहरात ९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
८४ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत
मुंबई महापालिकेने गुरुवारी मागील २४ तासांतील करोना रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार, २४ तासांत मुंबईत १३, ७०२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर नवीन बाधितांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक होते. २०,८४९ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. रिकव्हरी रेट ८८ टक्क्यांवर पोहोचला होता. मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण ९५१२३ इतके आहेत. तर, दुपटीचा दर हा ३६ दिवसांवर आला आहे. तर याच कालावधीत मुंबईत ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिलासादायक बाब म्हणजे करोनाबाधित रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.