हायलाइट्स:
- रत्नागिरीतील दापोली तालुक्यात खळबळजनक घटना
- एकाच घरातील तीन वृद्ध महिला जळालेल्या अवस्थेत आढळल्या
- मकर संक्रांतीच्या दिवशीच घडली धक्कादायक घटना
- घातपात की अपघात? संशय मात्र वेगळाच
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली. एका घरातील तीन वृद्ध महिला जळालेल्या अवस्थेत आढळल्या. रुक्मिणी उर्फ इंदूबाई शांताराम पाटणे, पार्वती पाटणे, सत्यवती पाटणे अशी मृत वृद्धांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी रवाना झाले. अधिक तपासासाठी पोलिसांनी रत्नागिरी येथून श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथकही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
संशयास्पद घटना
दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे एका घरातच इंदूबाई, पार्वती आणि सत्यवती या तीन महिलांचे मृतदेह आढळले. त्यांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. या तिन्ही महिलांचे कुटुंबीय मुंबईत वास्तव्यास आहेत. या महिला मृतावस्थेत आढळल्या असल्या तरी, प्रथमदर्शनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या तिन्ही महिलांच्या अंगावर गंभीर जखमा दिसून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, महिलांचे कुटुंबीय गावी येण्यासाठी निघाले. या महिलांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ही हत्या आहे की अपघात, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.