हायलाइट्स:
- महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ
- गेल्या २४ तासांत २३८ रुग्णांची नोंद
- एकट्या पुण्यात १९७ ओमिक्रॉनबाधित
- राज्यात गेल्या २४ तासांत ४३, २११ नवीन करोनाबाधित रुग्ण
करोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनची रुग्णसंख्या कमी झाली होती. गुरुवारी तर राज्यात एकही ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली नव्हती. मात्र, आज शुक्रवारी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यात २३८ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या पुणे महापालिका क्षेत्रात १९७ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये ३२, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी ३, मुंबईत २ आणि अकोला येथे १ ओमिक्रॉनबाधिताची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ही ६२९ झाली आहे. तर त्याखालोखाल पुणे महापालिका क्षेत्रात एकूण ५२६, पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १०७, तर सांगलीत एकूण ५९ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण १६०५ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील करोना आकडेवारी
आज ३३, ३५६ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६७,१७,१२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८ टक्के इतके आहे. आज राज्यात ४३,२११ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१५,६४,०७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७१,२४,२७८ (९.९६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,१०,३६१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ९२८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.