हायलाइट्स:
- शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली
- निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय होणार?
- अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर, तसंच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कडक करायचे की नाहीत, याबाबत शनिवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
रुग्णसंख्या वाढू लागल्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी ४ जानेवारीला तातडीने आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये निर्बंध लावण्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या ही आटोक्यात येत नसल्याने या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
दोन लाख ३६ हजार जणांचे लशीकरण
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १५ ते १८ वयोगटातील दोन लाख ३६ हजार लाभार्थ्यांचे लशीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या पाच लाख ५३ हजार १९० आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘या वयोगटातील लाभार्थ्यांचे तीन जानेवारीपासून लशीकरण सुरू करण्यात आले आहे. पुणे शहरात दोन लाख २४ हजार ५१५, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एक लाख १६ हजार ७० आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन लाख ११ हजार ९७५ लाभार्थी आहेत. त्यापैकी पुण्यात ४८ हजार ६०१ म्हणजे सुमारे २२ टक्के, पिंपरी-चिंचवड शहरात ३२ हजार ४९१ म्हणजे सुमारे २८ टक्के आणि ग्रामीण भागात एक लाख ५५ हजार ५९० म्हणजे सुमारे ७४ टक्के लशीकरण झाले आहे.’