औरंगाबाद : पक्षाच्या ऑनलाइन बैठकीत तक्रार केल्यावरून शिवसेनेच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये समोर आली असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुख व बाजार समितीचे माजी सभापतीने थेट आमदारालाच खुर्ची फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बुधवारी ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. यावेळी वैजापूर तालुक्यातील पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. तर काही पदाधिकाऱ्यांनी वैज्ञापुरातील वसंत क्लबमध्ये बसून बैठकीत सहभाग घेतला. याचवेळी बैठकीत उपस्थित असलेल्या शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजय निकम यांनी आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसून, पक्षातील कार्यक्रमातून डावलले जात असल्याची तक्रार केली. कदम रुग्णालयात सापडल्या १२ कवट्या, ५४ हाडं; गर्भपात प्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक खुलासा निकम यांनी तक्रार केल्याने क्लबमध्ये उपस्थित असलेल्या शिवसेना पदाधिकारी यांच्यात वाद सुरू झाला. दोन्ही गटातील शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून एकमेकांना आरोप सुरू झाले. पुढे हा वाद इतका विकोपाला गेला की, निकम यांनी शिवीगाळ करून आमदार रमेश बोरनारे यांच्यावर खुर्ची फेकून मारली. त्यामुळे दोन गटांतील पदाधिकारी हाणामारीला उतरले होते, तेव्हा उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्थीकरून हा वाद मिटविला.
शिवसेनेत नवा-जुना वाद…
शिवसेनेत फक्त वैजापूरच नाहीतर सर्वच तालुक्यात जुन्या आणि नवीन नेत्यांमध्ये गटबाजी असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पैठण तालुक्यातील जुन्या गटाने पत्रकार परिषद घेऊन आपली खदखद व्यक्य केली होती. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक निवडणुकीत पक्षातील गटबाजी रोखण्याचं शिवसेनेसमोर आव्हान असणार आहे.