हायलाइट्स:

  • कोणीही कोणाला कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करु नये
  • देशाच्या राजकारणाविषयी आमच्या पक्षातील वरिष्ठ लोक बोलतात
  • प्रत्येकजण आपापल्या परीने काम करुन इथपर्यंत पोहोचला आहे

पुणे: केवळ राष्ट्रवादी नाव असून पक्ष राष्ट्रीय होत नाही. शरद पवार यांचा पक्ष गल्लीतच राजकारण करु शकतो, या देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांच्या झोंबणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (अजित पवार |) यांनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. नव्या पिढीने शरद पवार (शरद पवार) यांच्याविषयी तारतम्य बाळगून बोलावं, असे अजित पवार यांनी म्हटले.

कोणीही कोणाला कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करु नये. देशाच्या राजकारणाविषयी आमच्या पक्षातील वरिष्ठ लोक बोलतात, मी त्याविषयी फारसं बोलणार नाही. मात्र, प्रत्येकजण आपापल्या परीने काम करुन इथपर्यंत पोहोचला आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. देशातील राजकारणाविषयी बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल. पण त्याविषयी बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि सुप्रिया सुळे आहेत. पण मी इतकंच सांगतो की, पवार साहेबांची उंची काय आहे, एकंदरीत देशपातळीवरचं त्यांचं काम आणि त्यांच्याविषयी असणारी आदराची भावना या सगळ्याविषयी विचार करुन नव्या पिढीने बोललं पाहिजे, तारतम्य सांभाळलं पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावं लागतं. पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही. शरद पवार यांचा पक्ष असा आहे, ‘पानी तेरा रंग कैसा, जिस मे मिलाए उसके जैसा’. ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी तृणमूल काँग्रेसशी बोलणी करतात. त्याच्या पक्षाचं अस्तित्व राष्ट्रीय नाही, त्यांच्याकडे राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पक्ष आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अभिनेते किरण माने यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चेनंतर म्हणाले…
अजित पवारांचं ‘स्लीप ऑफ टंग’

यावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांचा उल्लेख चुकून मुख्यमंत्री असा केला. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरे कठोर निर्णय घेऊ शकतात, असे अजितदादा म्हणाले. त्यांची ही गल्लत चांगलाच चर्चेचा विषय ठरली. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थनही केले. मुख्यमंत्र्यांना सगळ्याच बैठकांना उपस्थित राहता येत नाही. तशी गरजही नसते. ते रोज राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत असतात. मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करत आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here