मुंबई: ‘करोना व्हायरसमुळं संपूर्ण जगच संकटात आहे. त्यामुळं इतर कोणताही देश आपल्या मदतीला येणार नाही. आपणच आपली मदत करून या संकटावर मात करावी लागणार आहे. ज्या देशांनी काळजी घेतली नाही, त्यांची अवस्था भीषण झालीय. आपण ही काळजी घेत आहोत, आपण केवळ सरकारला सहकार्य करा,’ असं आवाहन यांनी आज केलं. ‘हेही दिवस जातील,’ असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला.

करोना व्हायरसचा फैलाव आणि महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार नेमकं काय काळजी घेतंय याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसंच, या युद्धात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांनी मानाचा मुजरा केला. डॉक्टरांशी बोलल्यामुळं माझं स्वत:चं मनोधैर्य वाढत आहे, असं ते म्हणाले. ‘करोनाशी लढताना सरकार सर्वांशी संवाद साधत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबतच विरोधी पक्षांशीही आमचा संवाद सुरू आहे. राज ठाकरे हे सुद्धा सरकारला वेगवेगळ्या सूचना करत आहेत. अनेक हात मदतीसाठी पुढं येत आहेत. सरकार सर्व बाजूंनी सज्ज आहे. फक्त नागरिकांनी सरकारच्या सूचनांचं पालन करण्याची गरज आहे. करोना व्हायरसचा तिसरा टप्पा सुरू होतोय. अशावेळी काळजी घ्यायला हवी. करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सरकार सज्ज आहे. हजारो बेड तयार करण्यात आले आहेत,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा कसलाही तुटवडा नाही. मात्र, संयम पाळणं गरजेचं आहे. घरातच राहा. मुलांसोबत वेळ घालवा. घराबाहेरची लढाई सरकारवर सोडून द्या. त्यासाठी सरकार मजबूत आहे, असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले…

>> साखर कारखान्यांनी त्यांचे कर्मचारी व ऊसतोड कामगारांची काळजी घ्यावी.

>> कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा. राहण्याची व जेवणाची सोय सरकार करतंय

>> आपल्याकडं कसलाही तुटवडा नाही. काळजी करू नका.

>> मधुमेह, स्थुलता असे विकार असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी

>> डॉक्टरांनी न्युमोनियाची लक्षणं असलेल्या रुग्णांवरही लक्ष द्यावं

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here