मॉडेलिंगच्या नावाखाली कार्यालयात ड्रेस बदलताना एका अल्पवयीन मुलीचे छुप्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या निर्मात्याने वाईट हेतूने अंगाला स्पर्श केल्याचा आरोपही या मुलीने केला आहे

मुलीचे छुपे चित्रीकरण करणारा निर्माता अटकेत; मॉडेलिंगच्या नावाखाली फसवणूक
मॉडेलिंगच्या नावाखाली कार्यालयात ड्रेस बदलताना एका अल्पवयीन मुलीचे छुप्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या निर्मात्याने वाईट हेतूने अंगाला स्पर्श केल्याचा आरोपही या मुलीने केला आहे. यानंतर कुलाबा पोलिसांनी पोक्सो, तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून एका लघुपट बनविणाऱ्या निर्मात्याला अटक केली
आहे. कुलाबा येथील एका हॉटेलमध्ये ही १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत काकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. यावेळी आपण शॉर्टफिल्मचा निर्माता असल्याचे सांगत एक ५० वर्षीय व्यक्ती या कुटुंबाकडे गेली. मुलगी हुशार आणि दिसायला सुंदर आहे, तिचे मॉडेलिंगमध्ये करियर घडवतो, असे त्याने सांगितले. मुलीच्या आईने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा संपर्क क्रमांक घेऊन आपल्या मुलीचा मोबाइल क्रमांकही त्याला दिला. दोन दिवसांनी आई आणि मुलगी त्याच्या कुलाबा येथील कार्यालयात गेल्या. या ठिकाणी या व्यक्तीने अनेक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्रींसोबत स्वतःचे फोटो दोघींना दाखविले. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर दोघींचा विश्वास बसला. यावेळी फोटोशूट करण्याच्या बहाण्याने त्याने या मुलीला वेगवेगळे ड्रेस घालायला दिले. कार्यालयातील खोलीमध्ये ड्रेस बदलत असताना खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचा संशय या मुलीला आला. याबाबत विचारणा करताच या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच फोटोशूट झाल्यानंतर त्याने दुचाकीवरून या मुलीला घरी सोडले. प्रवासादरम्यान तो अश्लील बोलण्याबरोबरच अंगाला वाईट हेतूने स्पर्श करीत होता. हा सर्व प्रकार तिने घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो, तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून या निर्मात्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: गुपचूप मुलीचे चित्रीकरण केल्याप्रकरणी निर्मात्याला अटक
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून