हायलाइट्स:
- नाणार प्रकल्पाचे काम रोखू नका, अन्यथा…
- शिवसेना आमदार राजन साळवी यांना फोनवरून धमकी
- कुटुंबीयांनाही संपवण्याची दिली धमकी
- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात साळवींनी दिली तक्रार
‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा’ अशी धमकी फोनवरून आमदार साळवी यांना देण्यात आली. त्यानंतर समोरील अज्ञात व्यक्तीने फोन कट केला. याबाबत आमदा साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राजापूर मतदारसंघात ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. आमदार साळवींचाही स्थानिकांसमवेत या रिफायनरीला विरोध आहे. १० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास साळवी यांना अज्ञाताने फोन केला. ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा’, अशी धमकी फोनवरून देण्यात आली. तर त्याच दिवशी रात्री सव्वाअकराच्या सुमारास साळवी यांना पुन्हा फोन आला. ‘रिफायनरी में हमारा पैसा लगा हुआ है, विरोध मत करना, नही तो…’, अशी धमकी समोरील व्यक्तीने त्यांना दिली. या प्रकरणी साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.