‘मुंबईतले सगळे मिलवाले मेले ना.. तेव्हा त्यांना जाळला. त्यांचा झाला धूर. आणि तो धूर भूत होऊन बसलाय मुंबईवर.’ हा सिनेमातील संवाद कथेची पार्श्वभूमी सांगणारा आहे. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार, लेखक जयंत पवार यांच्या ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या पुस्तकातील कथेवर हा सिनेमा आधारित आहे. यापूर्वी महेश मांजरेकर आणि जयंत पवार या जोडीनं बनवलेला ‘लालबाग परळ’ हा सिनेमा ज्याप्रमाणे तळागाळातील सत्यपरिस्थिती दाखवणारा होता. तसाच ‘नाय वरनभात लोन्चा…’ हाही सिनेमा आहे. जयंत पवार यांच्या लिखाणात स्वानुभव आणि सत्यपरिस्थितीचा दृष्टांत आहे; हे गिरणगावात राहिलेला चाकरमानी नाकारू शकणार नाही. तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा गिरणगाव, त्याची दाहकता त्यांच्या लिखाणात प्रतिबिंबित होते. चाळीचं रुपांतर टॉवरमध्ये व्हायला सुरुवात होत होती, तेव्हा लिहिलेली ही मूळ कथा. पण, सिनेमात दिग्दर्शकानं ती चार-पाच वर्षांपूर्वीच्या कालखंडात घडवली आहे. ही बाब मूळ कथा वाचलेल्यांना खटकू शकते. पण, माध्यमांतर करताना दिग्दर्शकानं कथेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तीस वर्षांपूर्वी चाळीत जी परिस्थिती होती तीच आजही आहे; हे नाकारता येणार नाही. तेच प्रश्न, तेच क्लेश, तोच रिडेव्हलमेंटचा स्वप्नाळू मुलामा. आज ती पूर्वीची दाहकता किंवा ‘सुरा पोटात खुपसून होणाऱ्या हत्या’ कमी झाल्या असतील; पण घाव आजही गिरणगावाच्या छाताडावर ताजे आहेत. हे सिनेमा पाहिल्यावर जाणवते.
वारं भणाण सुटल्यागत वावरणाऱ्या ‘दिग्या’ची ही गोष्ट आहे. वयानं चौदा-पंधरा वर्षांचा; पण मस्तकानं मात्र शातिर. दिग्याचा (प्रेम धर्माधिकारी) बाप एरियातील भाई. पण, त्याला कोणीतरी घातपातानं मारलं; ही बाब दिग्याच्या मनात घर करून आहे. तोसुद्धा भाई होण्याची स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. दिग्या आणि त्याचा मित्र इलियास (वरद नागवेकर) उनाडक्या करत नुसते हिंडत असतात. मांज्याला धार यावी म्हणून; ते ट्युबलाइटच्या काचांचा चुरा त्याला लावत असतात. ‘बदवणाऱ्याचा पतंग दिसतो, काटणाऱ्याचा मांजा दिसत नाय’ या विचारसरणीची ही मुलं. यौवनाच्या उंबरठ्यावर असल्यानं त्यांच्या हातून सातत्यानं अनैतिक गोष्टीही घडताहेत. पण, राहून राहून त्याच्यावर बेतलेल्या विविधांगी प्रसंगाचा परिणाम आपसूकच होतोय. एक हतबलतेची जाणीव दिग्याच्या आत पसरत जाते आणि कालांतरानं त्याचा उद्रेक होऊ लागतो. हा उद्रेक होण्यामागचा घटनाक्रमच सिनेमातून आपल्या समोर येतो.
दिग्या त्याची आजी बय (छाया कदम), काका शिऱ्या (रोहित हळदीकर) त्याची बायको सुप्रिया (कश्मिरा शाह) चाळीच्या छोट्याशा खोलीत राहत असतात. लहानग्या दिग्याचा सांभाळ व्हावा म्हणून बयेनं शिऱ्या आणि सुप्रियाला गावाहून मुंबईला आणलेलं असतं. दारूच्या गुत्याबाहेर उकडलेली अंडी विकून बय शे-दोनशे रुपये कमवायची. खमकी आणि तोंड उघडल्यावर शिवराळ. दिग्याच्या भविष्याची चिंता बयेला लागून राहायची. दुसरीकडे शिऱ्या बयेची खोली हडपण्याचे कारस्थान करतोय. नगरसेवक आणि बिल्डरला पैसे चारुन तो हे करु पाहतोय. ही बाब बयेला समजते आणि काही कारणास्तव ‘अचानक’ तिचा मृत्य होतो…! आपली खोली शिऱ्याच्या घश्यात जाईल म्हणून संतापलेला दिग्या मांज्यानं शिऱ्या आणि सुप्रियाचा जीव घेतो. हाच सिलसिला पुढे सुरू राहतो… दिग्याच्या वाट्याला येणारे एकामागोमाग एक का? कसे? कशासाठी? यमसदनी जातात हे पटकथेत पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. मुळात जयंत पवार यांनी लिहिलेली मूळ कथाही ताकदीची असल्यानं ती ताकद सिनेमात महेश मांजरेकर यांनी कुशलतेनं उतरवली आहे.
सिनेमाचा पूर्वार्ध काहीसा रेंगाळतो. पण, उत्तरार्धात वेग घेतो. दिग्या आणि इलियास यांचे भावविश्व-वृत्ती बालकलाकार प्रेम धर्माधिकारी आणि वरद नागवेकर यांनी पडद्यावर प्रभावीपणे रेखाटलं आहे. त्यांच्या भूमिकांची दिग्दर्शकीय हाताळणी, संवाद यांचं त्यात मोठं योगदान आहे. बयेच्या भूमिकेत असलेल्या छाया कदम यांनी आपल्या अभिनयकौशल्यानं अवाक केलं आहे. त्यांची देहबोली आणि तोंडी असलेले संवाद भूमिकेची उंची अधिक वाढवते. चाळीत राहणाऱ्या बाबी या गृहस्थाची भूमिका शशांक शेंडे यांनी केली आहे. तिची लांबी कमी असली तरी ती महत्त्वाची आहे. सिनेमाचे छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत प्रभावी आहे. रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, उमेश जगताप, गणेश रेवडेकर यांनीही त्यांच्या भूमिका समजून साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिका पटकथेत अधोरेखित होते आणि स्मरणात राहते. सिनेमा, त्यातील प्रसंग अत्यंत गडद आणि दाहक आहेत; त्यामुळे एक प्रकारची उदासी येते. मात्र त्यातून होणारे भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे.
सिनेमा : नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा
निर्माते : नरेंद्र हिरावत, श्रेयांस हिरावत
दिग्दर्शक-पटकथा-संकलन : महेश मांजरेकर
कथा-संवाद : जयंत पवार
छायाचित्रण : करण बी. रावत
संगीत-पार्श्वसंगीत : हितेश मोडक
दर्जा : साडेतीन स्टार