हायलाइट्स:

  • भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
  • प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार मैदानात
  • भाजपविरोधात केला हल्लाबोल

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. यावरून भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना काम करणे शक्य होत नसेल तर त्यांनी अन्य कोणाकडे सूत्रे सोपवावीत, अशी मागणीही भाजपकडून केली जात आहे. शिवसेनेकडून प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यात उडी घेत विरोधकांचा समाचार घेतला आहे. (रोहित पवार यांचा भाजपवर हल्ला)

यासंबंधी आमदार पवार यांनी म्हटलं आहे की, ‘मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय आहे. पण पंतप्रधानांच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री हजर असताना, मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाहीत? अशी टीका करणाऱ्या या नेत्यांनी हे केंद्राचं नाही तर महाराष्ट्राचं सरकार आहे, हे लक्षात घ्यावं. तौक्ते वादळाच्या वेळेस आदरणीय पंतप्रधानांनी शेजारच्या राज्याची पाहणी करून त्यांना तातडीने हजार कोटी रुपयांचा मदत केली. त्याचवेळी महाराष्ट्राला मात्र सापत्न वागणूक दिली. त्यावेळी मूग गिळून गप्प बसणारे भाजप नेते आज मात्र चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, हे आश्चर्यकारक आहे. केवळ केंद्रीय नेतृत्वाला खूश करून त्यांची मर्जी सांभाळण्याची राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच घेतली जाते. पण या राज्याचे आपण देणे लागतो, या भूमिकेतून कधीतरी राज्याच्या हिताची भूमिका घेण्याचं शहाणपण ज्या दिवशी त्यांना येईल, तो राज्यासाठी सुदिन असेल,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं आहे.

भीषण अपघात : स्कॉर्पिओ गाडीतील ३ जण ठार; एकाचा मृत्यूशी संघर्ष!

दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत, तेव्हापासून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या बैठकीतील अनुपस्थितीचे विरोधकांना कारण मिळाले. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राष्ट्रवादीला खिजवण्याचाही काही नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास नसेल तर मंत्री आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेच्या अन्य नेत्यांकडे सूत्रे सोपवण्यात यावीत, अशी तिरकस मागणीही विरोधकांकडून करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here