हायलाइट्स:

  • खारेगाव उड्डाणपुलाचे श्रेय नेमके कुणाचे?
  • शिवसेना, राष्ट्रवादीकडून कळव्यात झळकले बॅनर
  • ठाण्यात भविष्यात महाविकास आघाडी कायम राहील का?

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील खारेगाव उड्डाणपूल सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर श्रेयवादाचा संघर्ष सुरू आहे. या उड्डाणपुलावरून गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून राजकारण सुरू होते. अखेर या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं. मात्र, श्रेयवादाची लढाई सुरूच आहे. उद्घाटनावेळी आपण सगळे एकच आहोत, असं नेते आणि पदाधिकारी सांगत होते, पण दुसऱ्या दिवशी वेगळं चित्र दिसून आलं. संपूर्ण कळव्यात आज विविध ठिकाणी दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करत श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.

कळवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा खारेगाव येथील उड्डाणपुलाचे काल उद्घाटन झाले. या उड्डाणपुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या उद्घाटनाच्या सोहळ्यादरम्यान ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते तसेच गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपण महाविकास आघाडीचे असून एकत्र काम करत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उड्डाणपुलावरून सुरू असलेले राजकारण आणि श्रेयवादाची लढाई संपुष्टात यायला हवी होती. मात्र, उद्घाटनानंतर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून परस्परांविरोधात नाराजीचे सूर निघाल्याचे पाहायला मिळाले. आज, रविवारी कळवा शहरामध्ये ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. पुलाच्या श्रेयावरून संपूर्ण शहरात ही बॅनरबाजी केलेली आहे. या बॅनरवर शिवसेनेकडून ‘सततच्या पाठपुराव्याला यश’, असा मजकूर आहे, तर राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘ये पब्लिक है, सब जानती है’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या उड्डाणपुलावरून सुरू असलेला श्रेयाचा वाद कायम असल्याचे दिसते.

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची; खारेगाव उड्डाणपूलाच्या श्रेयावरुन लढाई
ठाण्यात पुन्हा ‘अघोरी राजकारण’, शिवसेना-काँग्रेसच्या उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा

ठाण्यात भविष्यात महाविकास आघाडी कायम राहील का?

सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ‘तुझं माझं जमेना’ असे चित्र दिसतेय. गेल्या अनेक दिवसांपासून कळवा खारेगाव येथील उड्डाणपुलावरून या दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतरही हा संघर्ष सुरूच असल्याचे बॅनरबाजीवरून तरी दिसतेय. त्यामुळे आगामी निवडणुकांदरम्यान ही महाविकास आघाडी ठाण्यात कायम राहते का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

मराठी पाट्या झाल्या नाही तर मनसेचा खळखट्याकचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here