हायलाइट्स:
- अखेर धाडसी चोरटे सापडले ‘वाघा’करांच्या पंजात
- गावकऱ्यांनीच शक्कल लढवून ३ आरोपींना पकडलं!
- परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
आदित्य उर्फ सोंड्या गणेश पिंपळे (वय वर्ष २० रा.अशोकनगर, श्रीरामपूर) प्रदीप उर्फ चक्क्या चंद्रकांत काळे (वय २१) आणि बाबू फुलचंद काळे (वय २४, दोघेही रा, सदाफुले वस्ती, जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जामखेड तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा, वाघा या परिसरात भरदिवसा घरफोड्यांचे गुन्हे वाढले आहेत. यामुळे ग्रामस्थ आणि पोलीसही हैराण झाले आहेत. शेतीची कामे सुरू असल्याने शेतावर जाणे क्रमप्राप्त आहे. याचा गैरफायदा चोरटे उठवत आहेत. शनिवारी असाच प्रकार झाले. पिंपळगाव आवळा येथील गणेश मधुकर ढगे सकाळीच घराला कुलूप लावून शेतावर गेले होते. दुपारी त्यांचे वडील घरी आले. त्यावेळी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. २५ हजार रुपये रोख व ९० हजारांचे दागिने चोरी गेले होते. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याच गावात आणखी काही ठिकाणी चोरी झाल्याचे त्यांना समजले. ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. तोपर्यंत शेजारील वाघा गावात असाच प्रकार घडला. सुमंत मारुती जगदाळे यांच्या घरी चोरी झाली. तेही शेतावर गेले असता चोरट्यांनी २२ हजार रुपये रोख व ४२ हजारांचे दागिने चोरून नेले.
जगदाळे यांनी ही माहिती उपसरपंच शिवाजी बारस्कर यांना दिली. त्यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून सर्व ग्रामस्थांशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र जमले. गावात शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी हे तिघे संशयित दुचाकीवरून जाताना आढळून आले. गावकऱ्यांनी त्यांना पकडले. त्यांच्याबद्दल संशय आला. त्यामुळे त्यांना पकडून ठेवून पोलिसांना बोलावण्यात आले. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे पथक तातडीने गावात आले. त्यांनी तिघा संशयितांकडे चौकशी केली, त्यांची झडती घेतली असता त्यांनी गुन्हे केल्याचे आढळून आले.
दरम्यान, आरोपींना पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. वाघा ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दिवसा धुमाकूळ घालणारे चोरटे पकडले गेल्याने पोलिसांनी त्यांचे कौतुक केलं आहे.